शेतकऱ्यांसाठी कृषी सनियंत्रण कक्ष स्थापन; लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम 2021 मध्ये बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याचा अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी शेतकऱ्यांना दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येईल. संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक श्री. अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव मो. नं. 9307525620 व श्री. पी. एस. महाजन, मोहिम अधिकारी, जि. प.जळगाव मो. नं.9767947247 तसेच कार्यालय दुरध्वनी क्रमांक 0257-2239054 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार saojalgaon@gmail.com वर सुद्धा मेलद्वारे पाठवता/नोंदवता येईल. असे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर वेगवेगळ्या अडचणी आल्याचे निदर्शानास येते. खरीप हंगामामध्ये बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते यांच्या अडचणी व तक्रारी वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्या कोविड-19 विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहिर केलेल्या टाळेबंदीच्या अनुषंगाने बियाणे, खते व किटकनाशके यांचे उत्पादन, प्रक्रिया, वाहतुक, वितरण व विक्री करतांना अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असुन या कक्षाची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत होणार असल्याचे संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.