मुलाने प्रेम विवाह केला,म्हणून त्याला यमसदनी पाठविला !

चाळीसगाव (प्रतिनिधी) प्रेम विवाह केला म्हणून आई- वडिलांनीच आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना चाळीसगाव येथे घडली. या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आई-वडिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,चाळीसगाव येथील कैलासनगर निलेश प्रताप कुमावत याने विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय-३५ रा. सदिच्छा नगर, जि. धुळे) हिच्याशी प्रेमविवाह केला होता.
मात्र त्याच्या विवाहाला घरून विरोध होता. त्याची आई अलका प्रताप कुमावत (वय-५६) व वडील प्रताप सहादु कुमावत (वय- ६४) त्यांच्या प्रेम विवाहास स्पष्ट विरोध होता. यामुळे या कुटुंबात अनेकदा खटके उडाले होते. यातच १३ मार्च २०२० रोजी निलेश प्रताप कुमावत याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
निलेशच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या प्रकरणी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय ३५, रा. सदिच्छा नगर, धुळे ) यांनी चाळीसगाव न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने याची दखल घेत कलम-१५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषंगाने सी.आर.पी.सी कलम १५६ (३) च्या आदेशानुसार शहर पोलिस ठाण्यात दि. ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री भादंवि कलम- ३०२, २०१, ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलाच्या खून प्रकरणी आई-वडिलांच्या विरूध्दच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.