16 रोजी अमळनेरला ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशन;शरद पवार,अजित पवार व जयंत पाटील यांची उपस्थिती

जळगांव:-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा शुक्रवारी (ता. १६) अमळनेर येथे रोड शो होणार आहे, तसेच ग्रंथालय सेलचे राष्ट्रीय अधिवेशनही होणार आहेत.राज्यभरातून तब्बल १५०० प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे विधीमंडळ प्रतोद आमदार अनिल पाटील, ग्रंथालय सेलचे राज्याध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली.
येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार अनिल पाटील यांनी सांगितले, की अमळनेर येथे ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारी होईल.अधिवेशनाचा प्रारंभ खासदार शरद पवार यांच्या हस्ते होईल.राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार जितेंद्र आव्हाड,लेखक रावसाहेब कसबे,विजय चोरमारे आदी उपस्थित राहतील.राज्यातील नऊ ग्रंथालयांना शरदचंद्र पवार उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. अधिवेशनाचा समारोप अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येईल.
▶️नेत्यांचा रोड शो
पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले, की तब्बल १४ वर्षांनंतर खासदार शरद पवार अमळनेर भूमीत येत आहेत. खासदार शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील,जितेंद्र आव्हाड यांचा रोड शो होईल.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून, तर ग्रंथालय सेल अधिवेशनापर्यंत रोड शो होईल. जळगाव ते अमळनेरदरम्यान धरणगाव व टाकरखेडा येथे शरद पवार यांचा सत्कार होईल. शिवाय ग्रंथालय सेलच्या अधिवेशनाचा समारोप झाल्यावर अमळनेर येथील प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणाऱ्या वादग्रस्त जागेस भेट देणार आहेत.
खासदार शरद पवार जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, अॅड. रोहिणी खडसे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, विकास पवार, विलास पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले आदी उपस्थित होते.