राहुलचा आदर्श विवाहाचा निर्णय युवा पिढीला व समाजापुढे एक आदर्श!- जयेशकुमार काटे

“आदर्श विवाहा”करणा-या नवदांपत्यांचा वि.का. सोसायटी तर्फे सत्कार!
पारोळा (प्रतिनिधी) राहुल काटे याने आपल्या विधवा वहिनीशी विवाह करून ३ भावंडांना पितृछत्र दिले, राहुलने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून युवा पिढीला एक चांगला संदेश दिला असे प्रतिपादन कोळपिंप्री विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जयेशकुमार काटे यांनी नवविवाहित दांपत्याचा सत्कार प्रसंगी केले.
कोळपिंप्री येथील युवा शेतकरी राहुल विनोद काटे (वय-३१) याने आपल्या विधवा वहिनी अनिता काटे (वय-२८) यांच्याशी विवाह करून तिच्या जीवनाला आधार दिला आठ महिन्याचा मुलगा “मयंक”, जुळ्या मुली विद्या व वैभवी या तीन मुलांसाठी “बाप” होऊन संपूर्ण जबाबदारीही घेतली आहे. त्यांच्या या “आदर्श विवाहा”च्या पार्श्वभूमीवर कोळपिंप्री विविध कार्यकारी सोसायटीच्या मार्फत नवदांपत्यासह चिमुकल्यांचा सत्कार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन जयेशकुमार काटे यांनी ड्रेस,साडी,शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भिकनराव पाटील, प्रतापराव पाटील, मोहन निकम, पंडितराव काटे,सचिव युवराज पाटील, गुलाब काटे, दिलीप काटे आदी उपस्थित होते.