अमळनेर तालुक्यातील ९२ शेतकऱ्यांचा केला सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) भारत हा कृषिप्रधान देश आहे. अशा या देशात शेतकरी राजा असून तो देशाचा आर्थिक कणा आहे. अशा या शेतकऱ्याच्या सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मत व्यवस्थापक विश्वेश डांगे यांनी केले. हायटेक सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कोळपिंप्री (ता पारोळा) येथील शेतकरी गिरीश काटे, अनिल काटे, गुलाब काटे, संजय काटे, शिवाजी काटे, रजनीकांत काटे यांचा हायटेक सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मार्केट डेव्हलपमेंटचे मॅनेजर विश्वेश डांगे यांच्या हस्ते सन्मानपत्र, गांधी- टोपी व रुमाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर यशोदीप सोनवणे उपस्थित होते. दरम्यान अमळनेर तालुक्यातील संदीप पाटील (मुडी) यांनी मक्याचे एका एकरात ६२ क्विंटल विक्रमी उत्पन्न घेतले तसेच रमणसिंग पाटील (हिंगोणें) यांनी दोन एकरात १०७ क्विंटल व प्रमोद पाटील (मंगरूळ) यांनी अडीच एकरात ११० क्विंटल उत्पन्न घेतले. या तिन्ही शेतकऱ्यांसह तालुक्यातील सुमारे ९२ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.