आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नाने दिवाळीत शेतकऱ्यांना मिळाला कापूस पीक विम्याचा आधार!

▶️ 25 टक्के रक्कम मिळाली आगाऊ,सुमारे 26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
अमळनेर (प्रतिनिधी) शेती व शेतकरी विषयी प्रचंड कळकळ असणाऱ्या आमदार अनिल पाटलांच्या प्रयत्नाने यंदा प्रथमच तालुक्यातील शेतकरी बांधवाना कापूस पीक विम्याची 25 टक्के रक्कम आगाऊ मिळाली असून एकूण 26 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाल्याने शेतकरी राजास ऐन दिवाळीत आधार मिळाला आहे.
यानिमित्ताने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी आधार मिळाल्याने काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरण पाटील,तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील,मार्केटचे प्रशासक सदस्य एल टी पाटील,यासह शेतकरी बांधवानी आमदार अनिल पाटील यांचे निवासस्थान गाठून आमदारांचा विशेष सत्कार केला.दरम्यान साधारणपणे सदर कापूस पीक विम्याची रक्कम जून अथवा जुलै दरम्यान शेतकऱ्यांना मिळत असते मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा जाणून असणाऱ्या आमदार अनिल पाटलांनी आपल्या शेतकरी बांधवाना पीक विम्याची आगाऊ रक्कम मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले होते.त्यास यश येऊन 25 टक्क्याप्रमाणे 26 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.आता 25 टक्क्याप्रमाणे हेक्टरी 8 हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मिळाले असून यापुढे 75 टक्के रक्कम अंदाजे 24 हजार रुपये हेक्टरी मिळू शकणार आहेत.
याआधी अनेकदा शेती पिकाचे नुकसान होऊनही पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहिले आहेत,अनेक वर्षे मागणी व तगादा लावूनही सदरची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही मात्र यावेळी आमदार अनिल पाटलांनी खरोखरच किमया दाखवून शेतकऱ्यांना आगाऊ पीक विम्याचा लाभ मिळवून दिल्याने संपूर्ण तालुका व मतदारसंघात आमदारांचे विशेष कौतुक होत आहे.