पिंगळवाडे जि.प.शाळेचा सर्वज्ञ देशमुखची ‘शाळा बाहेरची शाळा’ मध्ये निवड!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी सर्वज्ञ रविंद्र देशमुख ह्याची नागपूर आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या ‘शाळा बाहेरची शाळा’ या कार्यक्रमाच्या 211 व्या भागासाठी निवड झाली आहे. जिल्ह्यातून निवड झालेला जि.प.पिंगळवाडे शाळेतील सर्वज्ञ हा एकमेव विद्यार्थी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामिण भागातील विशेषत: जि.प.शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून नागपूर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्रथम फाऊंडेशन यांचेवतीने राज्यस्तरावर राबविण्यात येणारा हा उपक्रम जि.प.जळगाव तर्फेही जिल्हास्तरावर राबविला जात आहे.
शालेय अभ्यासाच्या विशिष्ट टास्क बद्दल माहिती देण्यासाठी सर्वज्ञ देशमुख या विद्यार्थ्याची निवड झाली. सर्वज्ञशी संवाद साधण्यापुर्वी ‘कोविड काळातील मुलांचा अभ्यास’ याबाबत पालक रविद्र देशमुख यांनी मुक्त संवाद साधला आहे. ‘महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या
विविध बोलीभाषा’ या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची सर्वज्ञने मोकळेपणाने उत्तरे दिली. शाळेच्या वर्गनिहाय व्हॉटसअप गृपच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे प्रसारण नियमितपणे ऐकणे, प्रथम महाराष्ट्र ॲपच्या माध्यमातून विविध टास्क, थोडी मस्ती थोडा अभ्यास, रेडीओ प्रक्षेपण, ऑनलाईन पेपर यात शिक्षक-पालक यांचे मदतीने विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग व अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन साहेब यांच्या प्रोत्साहनामुळे पिंगळवाडे शाळेला हा बहुमान मिळाला असे तंत्रस्नेही शिक्षक तथा शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी सांगितले. सर्वज्ञला यासाठी अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर,अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, शाळेतील शिक्षक प्रविण पाटील,रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञ व त्याच्या आई-वडीलांचे जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, प्राथ.शिक्षणाधिकारी विकास पाटील,अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, पिंगळवाडे सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कल्पना पारधी, उपाध्यक्ष समाधान पाटील तसेच गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे. मुलाखतीसाठी प्रथम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास निकुंभे यांचे मार्गदर्शन लाभले.
‘शाळा बाहेरची शाळा’ हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व शनिवार या 3 दिवशी सकाळी 10:30 वा. नियमितपणे प्रसारित होत असतो. सर्वज्ञचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे प्रसारण (भाग-211वा) गुरुवार दि.21-10-2021 रोजी स.10:30 वा. होणार आहे. तरी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.