शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन!

▶️ २७ मे रोजी पुन्हा तांदूळ महोत्सवाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना रास्त भावात चांगल्या दर्जाचा माल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मधली साखळी कमी झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने कृषी विभाग व ॲग्रेावर्ल्ड यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व ॲग्रेावर्ल्ड यांच्या विद्यमाने शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात घोटी येथील इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर चौधरी, आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, ॲग्रोवर्ल्डचे शैलेंद्र चव्हाण यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते. एकाच दिवसात तब्बल 12000 हजार किलो इंद्रायणी तांदूळ व 350 किलो सांगलीची सेलम हळद पावडरची विक्री झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पेमेंट, सोशल डिस्टनसिंग, सॅनटाईजची व्यवस्था करण्यात आली होती.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळातही बळीराजा विविध अडचणींना तोंड देऊन शेतमाल पिकवित आहे. त्यांनी पिकविलेल्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी विभागाने यासारखे विविध उपक्रम राबवावे. जेणेकरुन ग्राहक व शेतकरी या दोघांचाही फायदा होईल. या प्रकारचे महोत्सव तालुक्याच्या ठिकाणीही भरविण्याची सुचना यावेळी त्यांनी केली.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर म्हणाले की, या महोत्सवात ग्राहकांना आवश्यक असणारा इंद्रायणी तांदूळ तसेच सांगली येथील हळद उपलब्ध आहेत. जळगावमध्ये या उपक्रमास नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वीही देवगड येथील हापूस आंबा, नाशिक येथील द्राक्षे, लासलगाव चा कांदा तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी पिकलेला भाजीपाला व इतर पिकांच्या विक्रीलाही नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात ग्राहकांना तांदूळाच्या बॅगचे वितरण करण्यात आले.
ॲग्रेावर्ल्डचे शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले की ऑनलाईन नोंदणी करून भेसळमुक्त व अस्सल इंद्रायणी तांदूळ व सेलम हळद पावडरच्या विक्री महोत्सवाचे शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार २७ मे गुरुवार रोजी सकाळी 8 ते 11 वाजेच्या दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय (आकाशवाणी शेजारी) आवारात पुन्हा आयोजन करण्यात आले आहे. ॲग्रेावर्ल्डच्या शैलेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.