दुर्दैवी घटना;पती-पत्नीची मुलीसह तापी नदीत आत्महत्या!

0

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोद येथील रहिवासी एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक असलेले तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र रायभान देसले यांनी पत्नी व मुलगी यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील दभाशीजवळील तापीनदीच्‍या पुलावरून उडी घेत जीवनयात्रा संपविली. त्‍यांच्या आत्‍महत्‍येचे कारण समजू शकलेले नाही. देसले यांची कार पुलावर बेवारसपणे उभी असल्‍याने संशय व्यक्‍त केला जात होता. यानंतर शोध घेतला असताना मुलगी आणि वडीलांचा मृतदेह आढळून आला. पत्नीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
भोद (ता. धरणगाव) येथील राजेंद्र देसले (वय ५४), पत्नी वंदनाबाई देसले (वय ४८) आणि मुलगी ज्ञानल (वय २१) हे तिघे भरवस (ता. अमळनेर) येथे नातेवाईकांकडून कार्यक्रमानिमित्‍ताने गेले होते. कार्यक्रम संपल्‍यानंतर मुक्‍काम करून दुसऱ्या दिवशी ते घरी जातो म्‍हणून नातेवाईकांकडून कारने क्र.MH-19,AP 1094 ने दि.१७ मे रोजी सकाळी भरवस येथून निघाले. मात्र त्‍यांनी धरणगावकडे येण्याचा रस्‍ता सोडून उलट्या दिशेने प्रवास करण्यास सुरवात केली. यानंतर दभाशी येथील तापी नदीच्या पुलावर गाडी थांबवून त्‍यांनी आत्‍महत्‍या केली असल्याचा अंदाज आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास ते घरी भोद येथे येण्यासाठी निघाले. मात्र ते भोदला पोहचले नाही. यामुळे देसले यांच्या मुलाने नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. मात्र बुधवारी त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. यामुळे संशय आल्‍याने शोधाशोध सुरू केली. अनेकांनी गाडीचा क्रमांक पाहून शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन कुणी राजेंद्र पाटील नामक व्यक्तीच्या नावे असल्याने नेमकी ओळख पटत नव्हती. दुपारी चार वाजता राजेंद्र देसले यांचा मृतदेह नदीत तरंगतांना दिसून आले. रात्री उशिरा राजेंद्र देसले व त्‍यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. परंतु, राजेंद्र देसले यांच्या पत्नीचा शोध सुरू आहे.
देसले कुटुंबियांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!