पॉझिटिव्ह स्टोरी; मृत सहकाऱ्याच्या कुटूंबास समाज कल्याण कर्मचाऱ्यांकडून लाखाची मदत!

0

नंदुरबार(प्रतिनिधी) कोरोनामुळे आकस्मिक निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहून माणूसकी कुठेतरी जिवंत असल्याचं उदाहरण समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी समाजापुढे ठेवले आहे. सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक जितेंद्र साळुंखे (वय 47) यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. घरातील कर्ता पुरूष अचानक सोडून गेल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तेव्हा या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहत समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक आधार तर दिला ; परंतु 1 लाखांचा निधी तात्काळ जमा करून कुटूंबाच्या स्वाधीन केला.


जितेंद्र साळुंखे यांचं संपूर्ण कुटूंब कोरोना पॉझिटिव्ह होते.आई,पत्नी , मुलगा व स्वत:जितेंद्र साळुंखे यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू होते. या उपचारात त्यांची आई बरी होऊन घरीच विलीगीकरणात राहत होती. उपचार सुरू असतांना जितेंद्र यांचा मृत्यु झाला. मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या आईचा ही मृत्यु झाला. मुलगा व पत्नीं यांचे उपचार चालू असल्यामुळै त्यांना जितेंद्र यांच्या मृत्युची कल्पना देण्यात आली नाही. मुलगा व पत्नी उपचारातून बरे झाल्यावर त्यांना घडलेली हकीकत सांगण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. यावेळी समाज कल्याण कर्मचारी या कुटूंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहीले. त्यांना मानसिक आधार दिला.
समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे,कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे,नाशिक विभाग अध्यक्ष राजेंद्र देवरे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष के.डी.चव्हाण यांनी पुढाकार घेत राज्यातील सर्व समाजकल्याण कर्मचाऱ्यांना निधी जमा करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला समाज कल्याण कर्मचाऱ्यांबरोबर काही अधिकाऱ्यांनी ही चांगला प्रतिसाद देऊन आर्थिक मदत केली. यात राकेश महाजन, राकेश पाटील, श्रीमती अमिना शेख,डॉ.माधव कुसेकर या अधिकाऱ्यांनी भरीव आर्थिक मदत केली.
महाराष्ट्र शासनाकडून फ्रंट लाईन वर राहून काम करणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर कुटूंबाला 50 लाखांची मदत केली जाते. या यादीत समाज कल्याण विभाग येत नसल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना ही शासकीय मदत मिळत नाही. मात्र समाज कल्याण विभागाच्या अनेक शासकीय वसतिगृहात कोवीड सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. याठिकाणी समाज कल्याण विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून मान्यता देण्यात यावी.यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे,असे समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम शिंदे यांनी सांगितले.
जितेंद्र साळुंखे यांच्या कुटूंबाला 1 लाख रूपयांची रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे. त्यांच्या मुलाच्या अनुकंपा नोकरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. समाज कल्याण कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या कृतीमुळे समाजातील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!